जळगाव प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी पुन्हा एकदा डॉ. एस.आर. भादलीकर यांची नियुक्ती करण्यात आल्याने विद्यापीठ कर्मचार्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेऊन काळ्या फिती लाऊन आंदोलन सुरू केले आहे. आपल्या मागणीवर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट विद्यापीठातील कायदा अधिकारी डॉ.एस.आर.भादलीकर यांची नियुक्ती फक्त पाच वर्षासाठी तात्पुरत्या स्वरुपात होती. त्यामुळे सदरचा कालावधी संपून बराचकाळ लोटला असल्यामुळे डॉ.एस.आर.भादलीकर यांची विद्यापीठातील कायदा अधिकारी पदावरील सेवा तातडीने समाप्त करावी अशी मागणी विद्यापीठातील कृतिगटाने मागणी केलेली असतांना, सदर मागणीकडे दुर्लक्ष करुन त्यांची पात्रता नसतांना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु यांनी त्यांची प्र.कुलसचिव पदावर पुन्हा नियुक्ती बेकायदेशीर नियुक्ती केल्याने विद्यापीठ प्रशासनाच्या निषेधार्थ म्हणून आजपासून विद्यापीठ कृतिगटाच्या आवाहनानुसार विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने काळी फित लावून घोषणाबाजी करत आंदोलन सुरु केले आहे. यामुळे विद्यापीठ प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.
विद्यापीठातील कृतिगटाला प्राप्त माहितीनुसार कबचौउमवितील उमविसाठी कायदा अधिकारी हे पद तात्पुरत्या स्वरुपात पाच वर्षासाठी भरण्यात आले होते. पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नव्याने जाहिरात प्रकाशित करुन पुन्हा सदर पदासाठी नव्याने मुलाखती घेवून नेमणूक करणे आवश्यक होते. मात्र डॉ.भादलीकर यांच्याबाबत तसे काही केलेले दिसत नाही. उलटपक्षी एक महिन्यापुर्वी त्यांना प्र.कुलसचिव पदावरुन पायउतार करुन पुन:श्च दीड महिन्यांनंतर प्र.कुलसचिव पदावर नियमबाहयरित्या नेमण्यात आले आहे.
याचा निषेध म्हणून आज दि.27/09/2021 रोजी कार्यालयीन वेळेपासून विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी काळी फित लावून कार्यालयीन कामे करीत आहेत. तसेच दु.1.30 ते 2.00 या वेळेत झालेल्या व्दारसभेत कोविड-19चा प्रादुर्भाव विचारात घेता सामाजिक अंतर ठेवून (Social Distancing) विद्यापीठ कृतिसमितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ प्रशासनाचा जाहिर निषेध व्यक्त करुन सामुहिक घोषणाबाजी केली आहे.
तसेच या संदर्भात शासन स्तरावर कृतिगटाने दि.25/09/2021 रोजी महामहिम कुलपती महोदय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच शिक्षणमंत्री यांना विद्यापीठात सध्या सुरु असलेल्या गैरकारभाराची चौकशी करणेबाबत सविस्तर पत्र पाठवून विनंती केली असून, शासन आता या संदर्भात काय निर्णय घेते याकडे विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे.
याबाबत विद्यापीठात वादग्रस्त ठरलेले व शैक्षणिकदृष्टया अपात्र असलेले डॉ.एस.आर.भादलीकर यांना पुन्हा प्र.कुलसचिव पदावर का नियुक्त केले जात आहे. तर यामागे मोठा आर्थिक गैरव्यवहार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यापीठ कृति समितीने त्यांना त्या पदावर दुर केल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा पवित्रा घेतला आहे. हे आंदोलन कार्याध्यक्ष महेश पाटील आणि सचिव भैया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.