Home Cities जळगाव ई-आधार डाउनलोड करा घरबसल्या; हरवलेल्या किंवा खराब आधारचे नवीन पीव्हीसी कार्डही मिळवा...

ई-आधार डाउनलोड करा घरबसल्या; हरवलेल्या किंवा खराब आधारचे नवीन पीव्हीसी कार्डही मिळवा सहज


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र मानले जाते. बँकिंग, सरकारी योजना, मोबाईल सिम, शैक्षणिक प्रवेश अशा अनेक ठिकाणी आधारची आवश्यकता भासते. मात्र, कार्ड हरवण्याची किंवा खराब होण्याची भीती असल्याने अनेकजण ते सतत सोबत ठेवत नाहीत. अशावेळी ई-आधार म्हणजेच आधारची PDF स्वरूपातील व्हर्च्युअल कॉपी मोठी मदत ठरते. विशेष म्हणजे, Unique Identification Authority of India अर्थात UIDAI च्या माहितीनुसार ई-आधारही मूळ आधार कार्डइतकाच वैध मानला जातो.

ई-आधार डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम UIDAIच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागते. त्यानंतर ‘My Aadhaar’ विभागात जाऊन ‘Download Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करावे. पुढील पानावर पुन्हा ‘Download Aadhaar’ निवडून १२ अंकी आधार क्रमांक आणि कॅप्चा भरावा लागतो. त्यानंतर ‘Send OTP’ वर क्लिक केल्यावर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येतो. तो टाकून ‘Download Aadhaar’ वर क्लिक केल्यास आधारची PDF फाइल डाउनलोड होते. ही फाइल उघडण्यासाठी नावातील पहिली चार अक्षरे आणि जन्मवर्ष पासवर्ड म्हणून वापरावे लागते.

दरम्यान, आधार कार्ड हरवले असेल किंवा खराब झाले असेल, तरी नागरिकांना नवीन आधार कार्ड सहज मिळू शकते. UIDAI कडून PVC आधार कार्डची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे प्लास्टिक स्वरूपातील कार्ड असून ते अधिक मजबूत आणि टिकाऊ मानले जाते. यामध्ये सुरक्षित QR कोड, होलोग्राम, मायक्रो टेक्स्ट, प्रिंट तारीख यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये दिलेली असतात.

PVC आधार कार्ड मिळवण्यासाठीही ऑनलाइन प्रक्रिया सोपी आहे. नागरिकांनी UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन ‘Order Aadhaar PVC Card’ हा पर्याय निवडावा. त्यानंतर आधार क्रमांक, कॅप्चा आणि OTP पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. पुढे कार्डवरील माहिती तपासून पेमेंट पर्याय निवडावा लागतो. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे ७५ रुपयांचे शुल्क भरल्यानंतर PVC आधार कार्डची ऑर्डर पूर्ण होते. UIDAI पाच ते सात दिवसांत कार्ड प्रिंट करून भारतीय टपाल विभागाकडे सुपूर्द करते. त्यानंतर स्पीड पोस्टद्वारे ते नागरिकांच्या घरी पोहोचवले जाते.

ज्यांना ऑनलाइन प्रक्रिया करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी ऑफलाइन सुविधाही उपलब्ध आहे. नागरिक जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन नवीन आधार किंवा PVC कार्डसाठी अर्ज करू शकतात. काही सेवांसाठी ५० रुपयांपासून शुल्क आकारले जाते. ई-आधार आणि PVC आधार कार्डमुळे नागरिकांना आधारची सुरक्षित आणि सोयीस्कर सुविधा मिळत असून, हरवलेल्या किंवा खराब झालेल्या आधारची चिंता आता कमी झाली आहे.


Protected Content

Play sound