जळगाव प्रतिनिधी । कोरोना बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लस महत्वपूर्ण असल्याने जिल्हा प्रशासनातर्फे नागरीकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6 लाख 45 हजार 991 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 1 लाख 65 हजार 298 लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण 8 लाख 11 हजार 289 लाभार्थ्यांना कोरोना लसीचे डोस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यातर्फे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
जिल्ह्यात 16 जानेवारी, 2021 रोजी कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला होता. शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या सत्रात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरु केले. त्यानंतर 5 फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 45 वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते. 1 एप्रिलपासून जिल्ह्यातील 45 वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही खाजगी रुग्णालयातूनही नागरीकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तर 1 मे ते 11 मेपर्यंत जिल्ह्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरीकांचेही लसीकरण करण्यात आले. त्यानंतर 21 जूनपासून जिल्ह्यातील 18 वर्षापुढील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनापासून बचावासाठी लस महत्वपूर्ण असल्याने आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन नागरीकही स्वयंस्फुर्तीने मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी गर्दी करीत आहे.
कोरोना लसीकरणास नागरीकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे नागरीकांचे सहज व सुलभ लसीकरण व्हावे याकरीता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र कार्यरत करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्रामार्फत जिल्ह्यात आतापर्यंत 6 लाख 45 हजार 991 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 1 लाख 65 हजार 298 लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण 8 लाख 11 हजार 289 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहे. यात शहरी भागातील 4 लाख 43 हजार 818 तर ग्रामीण भागातील 3 लाख 67 हजार 471 नागरीकांचा समावेश आहे.
तालुकानिहाय झालेले लसीकरण
जळगाव-217547, भुसावळ-90003, अमळनेर-45178, चोपडा-47341, पाचोरा-41135, भडगाव-28225, धरणगाव-26515, यावल-56146, एरंडोल-22368, जामनेर-51513, रावेर-50712, पारोळा-29682, चाळीसगाव-64537, मुक्ताईनगर-26642, बोदवड-15745 याप्रमाणे लसीचे डोस देण्यात आल्याचेही जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.