मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभेच्या निवडणुकीत मतदानासाठी शिवसेनेचे आमदार मुंबईत दाखल झाले असून त्यांना बैठकीनंतर हॉटेलमध्ये नेण्यात आले. त्या हॉटेलबाहेर पोलिसांसमवेत शिवसैनिक पहारा देत आहेत, यावरून भाजपचे आ. अतुल भातखळकर यांनी भरवसा न्हाई, मतदानापूर्वी शिवबंधन घट्ट आहे कि नाही याची खात्री करून घ्या असा टोला लगावला आहे.
राज्यसभा मतदानासाठी दोन-तीन दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर आपले आमदार फुटू नयेत म्हणून सर्वच पक्षांकडून खबरदारी घेण्यात येत असून हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे बहुतांश आमदार मुंबईत दाखल झाले असून त्यांची बैठक घेण्यात आली. आज कॉंग्रेसची बैठक होत असून त्यांना देखील बॅग भरूनच येण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भाजपची उद्या बैठक होणार आहे. या गडबडीत राष्ट्रवादीकडून राज्यभरात दौरे करीत अपक्ष आमदारांच्या भेटी घेण्यावर भर दिला जात आहे, शिवसेनेसह भाजपाकडून आ.हितेंद्र ठाकूर यांच्या भेटी घेतल्या आहेत. यावर मतदानास अजून ३ दिवस शिल्लक असून १० तारखेस ४ वाजेपर्यंतची वेळ आहे. शेवटच्या क्षणी निर्णय घेऊ असे संकेत आ. ठाकूर यांनी दिले आहेत. तर भाजपाने कितीही घोडेबाजार आणि केंद्रीय यंत्रणाचा दुरुपयोग करायचा प्रयत्न केला तरी काही परिणाम होणार नाही, महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतीलच असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.