“आमच्या शिक्षकांची बदली करू नका”; मंत्री महाजनांसमोर विद्यार्थ्यांचं साकडं !

जामनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “आमचे शिक्षक आम्हाला चांगले शिकवतात, त्यामुळे त्यांची बदली होऊ नये.” असे म्हणत विद्यार्थ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना साकडं घातलं आहे. जामने तालुक्यातील नवी दाभाडे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांची बदली रोखण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट मंत्री महाजन यांची भेट घेतली. आपल्या शिक्षकांची बदली होऊ नये, अशी विनंती विद्यार्थ्यांनी मंत्र्यांना केली.

नवीदाभाडी शाळेतील गजानन मंडवे आणि ऋषिकेश शिंदे हे दोन शिक्षक बदलीस पात्र ठरले आहेत. मात्र, त्यांच्या बदल्या होऊ नयेत म्हणून विद्यार्थ्यांनी एकत्र येत ग्रामस्थ आणि पालकांसह मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानी भेट घेतली आणि साकडे घातले.

विद्यार्थ्यांनी सांगितले की, “आमचे शिक्षक आम्हाला चांगले शिकवतात, त्यामुळे त्यांची बदली होऊ नये.” त्यांच्या आग्रहाने पालक आणि ग्रामस्थही या मागणीसाठी पुढे आले. विद्यार्थ्यांच्या भावना ऐकून मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, “मी शिक्षण अधिकाऱ्यांशी बोलतो आणि काय करता येईल हे पाहतो.”

ही घटना विद्यार्थ्यांची आपल्या शिक्षकांवरील आपुलकी आणि विश्वास दर्शवते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील अनोखे नाते अधोरेखित करणाऱ्या या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Protected Content