जळगाव, प्रतिनिधी | आ.चंद्रकांत पाटील हे माझे विरोधक आहेत, त्यांनी सूड बुद्धीने माझ्यावर आणि कुटुंबावर आरोप केले आहेत. पण बँकेने कुठलेही काम नियमबाह्य केलेले नाही. असे सांगून, त्यांनी आरोप करण्यापेक्षा आताच्या सरकारला त्यांनी पाठींबा दिलेला आहे. त्यामुळे सरकारकडे पाठपुरावा करून ‘मधुकर’ साखर कारखान्यासाठी थक हमी मिळवून आणावी आणि शेतकऱ्यांचे हित जोपासावे, असा सल्ला जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे यांनी आज (दि.१०) पत्रकारांशी बोलताना दिला.
मुक्ताई कारखान्याबद्दल आ. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपांबद्दल पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले असता त्या पुढे म्हणाल्या की, आ.चंद्रकांत पाटील हे बँकेशी संबंधित नाहीत. शेतकऱ्यांनी त्यांचे हित बघण्यासाठी संचालक मंडळ जिल्हा बँकेवर निवडून दिले आहे. शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासोबतच बँकेला नफा कसा मिळेल, हे बघणे ही सुद्धा संचालकांचीच जबाबदारी आहे. त्यानुसार सगळ्या नियमांनी कायद्याच्या चौकटीतच सगळे निर्णय झालेले आहेत. असेही त्या म्हणाल्या.