जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण तसेच क्रीडा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी आपल्या १७ रोजी येऊ घातलेल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना आवाहन करत वाढदिव साजरा न करण्याचे सूचित केले आहे.
ना. गिरीश महाजन यांचा १७ मे रोजी वाढदिवस आहे. ते यंदाचा वाढदिवस साजरा करणार नसून या संदर्भात त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे की, ”आपण कधी वाढदिवस साजरा करत नाही. यंदा शेतकर्यांना अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. यामुळे मोठी हानी झाली आहे. तर, आता उष्णतेची लाट सुरू असून यामुळे सर्वसामान्य जेरीस आले आहेत. या अनुषंगाने यंदा माझ्या वाढदिवसाला कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये, कुणी माझ्या वाढदिवसानिमित्त फलकांसह कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी करू नये !” असे यात म्हटले आहे.
या आवाहनात ना. गिरीश महाजन पुढे म्हणाले की, ”कडाक्याच्या उन्हामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे. यामुळे कुणाला काही कार्यक्रम करायचेच असतील तर उष्णतेची काळजी घेऊन रक्तदान संकलन करावे असे माझे आवाहन आहे. मी यंदाच्या वाढदिवसाला घरी नसून बाहेरगावी असलो तरी आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हे माझ्या सोबत कायम असतील याची मला खात्री आहे. याच्या बळावरच मी आजवर वाटचाल केली असून पुढे देखील करणार असल्याचे” ना. गिरीश महाजन यांनी या आवाहनपत्रात नमूद केले आहे.