घाबरू नका : ओमायक्रॉनचा रूग्ण सात दिवसात होतो बरा !

मुंबई प्रतिनिधी | कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा तीव्र गतीने प्रसार होत असला तरी याचा रिकव्हरीचा रेट हा तब्बल ९९ टक्के असून यात रूग्ण सात दिवसात बरा होत असल्याची माहिती संशोधनातून समोर आली आहे.

या संदर्भात वृत्त असे की, दिल्ली येथील लोकनायक हॉस्पिटलमधील तज्ज्ञांनी केलेले संशोधन हे अतिशय दिलासा देणारे ठरले आहे. देशातील ९९ टक्के ओमायक्रॉनबाधित केवळ सात दिवसांत बरे झाले आहेत. त्यांच्यामध्ये कोरोनाची अतिशय सौम्य लक्षणे दिसून आली असल्याची माहिती या हॉस्पीटलच्या संशोधन अहवालातून समोर आली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट अत्यंत वेगाने पसरतो. मात्र, डेल्टाच्या तुलनेत शरीरातून लवकर निघून जातो. डेल्टा ची लागण झालेल्या रुग्णांना बरे होण्यासाठी ७ ते १० दिवस लागतात. तर काही रुग्णांना महिनाभराचा देखील कालावधी लागतो. मात्र, ओमायक्रॉनच्या बाबतीत ९२ टक्के रुग्णांची आरटी-पीसीआर चाचणी आठवड्यात निगेटिव्ह येत आहे.

दरम्यान, ओमायक्रॉन विषाणूमुळे जीवितहानी कमी होत असल्याचे निष्कर्ष जगभरातील आकडेवारीतून समोर आले आहे.

मागील पंधरा दिवसांतील रुग्णसंख्या वाढ आणि मृत्यू दर पाहता महाराष्ट्राचाही मृत्यू दर कमी असल्याचे दिसून येते. मात्र असे असले तरी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचा इशारा देखील तज्ज्ञांनी दिला आहे. विशेष करून लसीकरण हे अतिशय उपयुक्त ठरल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पहिल्या दोन लाटा व राज्यातील ८० टक्क्यांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाल्याने समूह प्रतिकारकशक्ती तयार झाल्याने बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित अथवा सौम्य लक्षणातूनच बरे होताना दिसत आहेत.

 

Protected Content