जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाळू वाहतूकीच्या कारवाईत शासकीय कामात अडथळा निर्माण करून दोन वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीला पोलिसांकडून जळगावात अटक करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी त्यास यावल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गोकूळ उर्फ डॉन रघुनाथ कोळी (रा.भोलाणे, ता.जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, “गोकूळ कोळी हा अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करताना मिळून आल्यावर त्याने तलाठी यांच्याशी हुज्जत घालून सन २०२० मध्ये फसार झाला होता. त्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अवैध वाळू वाहतूकीसह शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गोकूळ याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला होता. गेल्या दोन वर्षांपासून तो पोलिसांना मिळून येत नव्हता.
गोकूळ उर्फ डॉन याला पकडण्यासाठी एलसीबीचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांनी स्वतंत्र पथक नेमले होते. गोकूळ हा भोलाणे गावात राहत असल्याची माहिती मिळाल्यावर पथकाने त्याचा शोध घेतला. त्यानंतर बांभोरी गावातही पथकाने शोधकार्य सुरू केले. शेवटी तो जैनबाद येथील नातेवाईकांकडे आल्याची माहिती मंगळवारी सकाळी एलसीबीला मिळाली. पथकाने लागलीच जैनबाद गाठून गोकूळ याच्या मुसक्या आवळल्या.
त्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, राजेंद्र पवार यांनी ही कारवाई केली आहे.