नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी आफ्रिकेतील सेनेगल कोर्टाने जामीन मंजूर करताच फरार झाल्याचे वृत्त आहे. याच वर्षी २१ जानेवारीला सेनेगल येथे भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या माहितीच्या आधारे रवी पुजारीला अटक झाली होती. पुजारी सेनेगलबाहेर गेला असेल तर त्याला शोधणे कठीण असल्याचे सांगितले जात आहे.
आफ्रिकेतील सेनेगलमध्ये राहत असलेल्या रवी पुजारीवर भारतीय गुप्तचर यंत्रणा सतत लक्ष ठेवून होत्या. त्याला भारतात परत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. सेनेगलला येण्यापूर्वी पुजारी बर्किना फासो येथे राहत होता. रवी पुजारीविरोधात भारतात सुमारे २०० गुन्ह्यांची नोंद आहे. कर्नाटक पोलिसातील सूत्रांनुसार, पुजारी सेनेगलमधून इतर देशात पळून गेला आहे. मात्र या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. पुजारीला इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीसही जारी केली आहे. रवी पुजारीने आपले नाव बदलून ते अँथनी फर्नांडीस असे ठेवले आहे. त्याने बुर्किना फासो देशाचे नागरिकत्व घेतल्याचा दावा केल्याचेही सूत्रांनी सांगितले.
भारताकडून होणारी अटक टाळता यावी यासाठी पुजारीने सेनेगलमध्ये बनावट फसवणुकीचा स्वत:वरच खोटा खटला दाखल केला होता. आपल्याला सेनेगलबाहेर जाता येऊ नये, असा या मागे पुजारीचा उद्देश होता. सेनेगल कोर्टाने पुजारीला जामीन मंजूर करताना या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत तो देश सोडून कुठेही जाऊ शकणार नाही, अशी शर्त घातली होती. असे असतानाही पुजारी पळून गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सेनेगल बुर्किना फासो, माली आणि आयवरी कोस्टसारख्या देशांनी वेढलेला आहे. या मुळेच पुजारीसारख्या गुन्हेगारांना पळून जाणे सोपे झाले आहे, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, दोन अधिकाऱ्यांची टीम मुंबईहून सेनेगलला रवाना झाली असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणा, कर्नाटक पोलीस, गुजरात एटीएस आणि आफ्रिकी अधिकाऱ्यांना पुजारीचा पत्ता माहीत झाला होता, असेही सूत्रांनी सांगितले आहे.