चाळीसगाव प्रतिनिधी । भावकीच्या मागील भांडणाचा राग मनात धरून दोन भावांना पोटात धारदार शस्त्राने वार केल्याची घटना रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास तालुक्यातील बेलदारवाडीत घडली. या हल्ल्यातील एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. याबाबत ग्रामीण पोलीसात तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील बेलदारवाडीत रविवारी रात्री ११ वाजता भावकीच्या वादातून ज्ञानेशवर सुभाष कुमावत (वय-32) याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवत पोटात बापू उर्फ पिंटू सीताराम कुमावत, छोटीबाई गोपीचंद कुमावत, किरणबाई राकेश कुमावत चाकू भोसकला, यात ज्ञानेश्वरचा मृत्यू झाला. आपल्या भावावर हल्ला झाल्याचे पाहून भाऊ बापू कुमावत याने आवरण्याचा प्रयत्न केला. त्याल बापू कुमावतवर देखील वार करून त्याच्याही पोटात सुरा खुपसल्याने तो गंभीर जखमी झाला.
हल्ला झाल्यानंतर तिघे आरोपी फरार आहेत. याबाबत संतोष सुभाष कुमावत यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीसात अरोपी बापू उर्फ पिंटू सीताराम कुमावत, छोटीबाई गोपीचंद कुमावत, किरणबाई राकेश कुमावत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकरे करीत आहे.