
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बळीराम पेठ परिसरात एका नामांकित डॉक्टरचे घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी डॉक्टर आपल्या कुटुंबासह पुण्याला मुलाकडे गेले असताना ही चोरी झाली.

जळगाव शहरातील बळीराम पेठ येथील रहिवासी डॉ. अजिजुल्ला इस्माईल शेख (वय ६२) हे २६ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आपल्या कुटुंबासह पुण्याला मुलाला भेटण्यासाठी गेले होते. दरम्यान, त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाची कडी-कोंडा आणि कुलूप तोडून घरात प्रवेश केला. ३१ मार्च रोजी जेव्हा डॉक्टर परतले, तेव्हा त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केला असता कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते आणि मौल्यवान ऐवज गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने, रोकड असा एकुण ३२ हजारांचा ऐवज लांबविला. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.



