
पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील नगाव गावाच्या शिवारात एका डॉक्टराला भररस्त्यात अडवून बेदम मारहाण करत त्यांच्या खिशातील १५ हजार रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी ४ मार्च रोजी रात्री ८ वाजता पारोळा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. कैलास निळकंठ पाटील (वय ६०, रा. लोणी सिम, ता. पारोळा) हे १७ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीने नगाव गावाच्या शिवारातून जात होते. यावेळी आरोपींनी त्यांच्या मारुती सुझुकी सेलेरियो कार (क्र. HH 46 BV 6048) डॉक्टरांच्या गाडीसमोर आडवी लावून त्यांचा रस्ता अडविला.
कारमधून उतरलेल्या केतन दिलीप गोतरणे आणि त्याच्या इतर चार साथीदारांनी “तू आमच्याविरुद्ध न्यायालयात दाखल केलेला खटला मागे का घेत नाहीस?” असे म्हणून डॉक्टरांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपींनी डॉक्टरांच्या शर्टची कॉलर पकडून त्यांना गाडीवरून खाली ओढले आणि लाथाबुक्क्यांसह चपलेने बेदम मारहाण केली. यावेळी डॉ. पाटील याचा शर्ट फाडून त्यांच्या खिशातील १५ हजार रूपये बळजबरीने काढून घेतल्या आणि ठार मारण्याची धमकी दिली.
या गंभीर घटनेबाबत डॉक्टरांनी न्यायालयात दाद मागितली होती. माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार, पारोळा पोलिसांनी आरोपी केतन दिलीप गोतरणे, दमयंती दिलीप गोतरणे, साक्षी संतोष भोईर आणि इतर दोन अज्ञात व्यक्तींविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि योगेश महाजन करत आहेत.



