मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुनावणी पुढे ढकलली जात असतांना शिवसेनेने याबाबत लवकर निकाला लागावा म्हणून स्वतंत्र याचिका दाखल केली आहे.
उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात दाखल पाच याचिकांवरील सुनावणी ही लागोपाठ पुढे ढकलण्यात येत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. काल जाहीर झाल्यानुसार सुप्रीम कोर्टात आज यावर सुनावणी अपेक्षित होती. मात्र आज ही याचिका घेण्यात न आल्याने यावर उद्या सुनावणी होणार आहे. अर्थात, आता या प्रकरणी ‘तारीख पे तारीख’ असा प्रकार सुरू आहे.
नेमक्या याच प्रकाराच्या विरोधात शिवसेनेने सुप्रीत कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी व्हावी म्हणून शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई आणि अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका मेन्शन केली आहे. आता याबाबत सुप्रीम कोर्ट नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.