नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिशा सलीयन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केल्याने विधानसभेत एकच गदारोळ उडाल्याचे दिसून आले.
खासदार राहूल शेवाळे यांनी काल लोकसभेत ठाकरे पिता-पुत्रावर गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पाठोपाठ आज विधानसभेत देखील दिशा सालियान प्रकरणावरून गदारोळ उडाला आहे. शिंदे गटाने दिशा सालियान प्रकरणाची चौकशीबाबत मुद्दा उपस्थितीत केला. या पाठोपाठ भाजपचे आमदार नितेश राणेंनीही यात उडी घेतली. त्यामुळे विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज २० मिनिटांसाठी थांबवले आहे.
दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला? या प्रकरणात कोणत्या तत्कालिन मंत्र्याचा समावेश आहे? तिच्या मृत्यूनंतर तिच्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज का गायब करण्यात आले? याची कसून चौकशी करा तसेच याप्रकरणात आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. यावरुन सभागृहात जोरदार गोंधळ झाला. यानंतर कामकाज तहकूब करण्यात आले.