मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । बॉलिवूडचा ‘बादशाह’ म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान नेहमीच आपल्या चित्रपटांसोबतच त्याच्या आलिशान दिवाळी पार्टीसाठीही चर्चेत असतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही चाहत्यांना आणि बॉलिवूडमधील सेलिब्रिटींना ‘मन्नत’मधील दिवाळी पार्टीची उत्सुकता होती. मात्र यंदा ही परंपरा खंडित होत आहे. किंग खानच्या ‘मन्नत’ बंगल्यात यावर्षी दिवाळी पार्टी होणार नाही, आणि यामागचं कारणही आता स्पष्ट झालं आहे.
शाहरुख खानच्या मॅनेजर पूजा ददलानीने या बातमीला दुजोरा दिला असून, ‘मन्नत’मध्ये सध्या नूतनीकरण आणि दुरुस्तीचं मोठं काम सुरू असल्याने यंदा दिवाळी पार्टीचं आयोजन रद्द करण्यात आलं आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून हे काम सुरु असून, घराच्या इंटिरिअरपासून ते बाह्य रचनेपर्यंत अनेक सुधारणा करण्यात येत आहेत. परिणामी, किंग खान आणि त्याचा परिवार सध्या मुंबईच्या वांद्रे येथील पाली हिल भागातील एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत आहेत.

शाहरुख खानच्या दिवाळी पार्टीचा बॉलिवूडमध्ये एक खास मान आहे. या पार्टीमध्ये अनेक नामांकित सेलिब्रिटींची उपस्थिती असते. पार्टीदरम्यान शाहरुख सर्वांसोबत फोटो क्लिक करतो आणि अगदी पार्टी संपल्यानंतरही प्रत्येक पाहुण्याला स्वतः गेटपर्यंत सोडायला जातो. ही पार्टी केवळ सेलिब्रिटींसाठी खास नसते, तर पापाराझींसाठीही ही एक मोठी संधी असते. मात्र, पार्टी दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था असल्याने आतले फोटो फारसे बाहेर येत नाहीत. तरीही शाहरुख पार्टीनंतर पापाराझींना खास पोझ देताना हमखास दिसतो.
शाहरुख खानसोबतच यंदा आणखी एक अभिनेता दिवाळी पार्टीपासून दूर राहणार आहे – आयुषमान खुराणा. सध्या आयुषमान त्याच्या आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘थामा’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र असल्यामुळे त्यानेही यंदा दिवाळी पार्टी न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी बॉलिवूडमध्ये थोडी शांत आणि घरगुती स्वरूपात पार पडणार असल्याचे चित्र आहे.



