लासुर, ता.चोपडा, प्रतिनिधी | येथील जीवनज्योती फाऊंडेशन, ए.के.गंभीर मित्र परिवार आणि श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील उत्तमनगर येथे आदिवासी कुटुंबांसोबत नुकतीच दिवाळी साजरी करण्यात आली. परिसरातील काही आदिवासी पाडे असेही आहेत ते दिवाळीचा आनंद दारिद्यामुळे साजरा करू शकत नाही त्यांच्या चेहऱ्यावर हा आनंद आणण्यासाठी येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आदिवासी पाडा उत्तमनगर येथे हा उपक्रम राबवण्यात आला.
लासूर येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ए.के. गंभीर, कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष कैलास बाविस्कर, जीवन ज्योती फाऊंडेशनचे अध्यक्ष मास्टर टेलर्स, सह सचिव दिलीप पालीवाल, नाटेश्वर पीक संरक्षण सोसा.चे माजी व्हा. चेअरमन किशोर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर येथील सर्व कुटुंबासोबत संध्याकाळी उपस्थित राहून १५० कुटुंबाना दिवाळीनिमित्त फरसाण व गोड पदार्थ घरोघरी देऊन तसेच भाऊबीजेनिमित्त २१ आदिवासी महिलांना नवी साडी भेट देवून दिवाळी साजरी करण्यात आली. सर्व सदस्यांच्या हस्ते साडीचे व फरसाणचे घरोघरी वाटप करण्यात आले. सर्व आदिवासी कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद या मित्र परिवाराने घेतला.
यावेळी जीवन ज्योती फाऊंडेशनचे सचिव जितेंद्र महाजन यांनी प्रास्ताविक केले तर ए-वन क्लासेसचे संचालक राहुल पाटील यांनी मानले. सूत्रसंचलन जीवन ज्योती फाऊंडेशन संचालक प्रेमराज शेलकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी लासूर येथील ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक महाजन, वासुदेव महाजन, सुरेश महाजन, किसान विद्या प्रसारक मंडळाचे माजी संचालक मुरलीधर सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते नारायण बागुल, सामाजिक कार्यकर्ते विजय बाविस्कर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आरिफ मन्सूरी, योगेश्वर महाजन, नुरा पटेलिया, सादिक पठाण, शिवसेना गट प्रमुख देविदास मगरे, ह.भ.प.रमेश महाजन, सुरेश उत्तम महाजन, लासुर विकासोचे माजी चेअरमन एन.टी. माळी, श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्यचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण माळी, माळी समाज विकास मंडळाचे संचालक रमेश महाजन, आदिवासी कर्मचारी पतसंस्था जळगावचे संचालक नरेंद्र महाजन, नाटेश्वर पीक संस्थेचे तज्ञ संचालक संदीप महाजन, सामाजिक कार्यकर्ते संजय कुंभार, राजू कुंभार, श्री संत सावता माळी युवक संघ शाखा लासुरचे अध्यक्ष नरेंद्र महाजन, उपाध्यक्ष जितेंद्र माळी, विलास महाजन, इंजि.भूषण महाजन, उत्तम नगर येथील पोलीस पाटील नरसिंग पावरा, ए-वन क्लासेसचे संचालक राहुल पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी भिका पिंजारी, ‘गाव माझा’चे प्रतिनिधी परेश पालीवाल आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सरस्वती क्लासेस चे संचालक विनोद महाजन, राहुल मगरे, सौरभ महाजन, यश महाजन, ज्ञानेश महाजन यांच्यासह अनेक दानशूर व्यक्तींनी या उपक्रमासाठी सहकार्य केले.