रावेर तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्याची शिवसेनेची मागणी

Raver News 1

रावेर प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून रावेर तालुक्यात संततधार पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी शिवसेनातर्फे आज रावेर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटल्याप्रमाणे, यावर्षी सन २०१९-२० मध्ये रावेर तालुक्यात जून महिन्यापासून ऑक्टोबर महिनाअखेरीपर्यंत पर्जन्यवृष्टी अतिशय झाली असल्याकारणाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. रावेर तालुक्यात मुख्यत्वे केळी, कापूस, ज्वारी, बाजरी, मका, कडधान्ये अशी पिके घेतली जात असून सर्वच पिकांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे. सदर अतिवृष्टीमुळे कापूस हे पीक सडलेले आहे. ज्वारी, बाजरी या पिकांचे कोंब निघायला सुरुवात झालेली आहे. केळी अतिवृष्टीमुळे पिवळी पडलेली आहे. कडधान्ये पूर्णपणे जमिनदोस्त झालेली आहेत. कोणत्याही प्रकारचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येऊ शकत नसल्याकारणाने शेतकरी हवालदिल झालेला आहे. सद्यपरिस्थिती बघता दिवाळीसारखा सण देखील माझा सर्जा-राजा साजरा करु शकलेला नाही. घरामध्ये पिकच नाही, अन्नधान्य नाही. यामुळे आर्थिक टंचाईत शेतकरी सापडला असून रावेर तालुक्यात आपण तात्काळ ओला दुष्काळ जाहिर करावा व सर्वेक्षण करुन, पंचनामे करुन तात्काळ शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान एकरी २० हजार रूपये तात्काळ देण्यात यावे. जेणेकरुन शेतकऱ्यांच्या चुली पेटतील व शेतकरी आत्महत्या करण्यापासून परावृत्त होतील.

आंदोलन करण्याचा दिला इशारा
रावेर तालुक्यात ओला दष्काळ जाहिर न केल्यास व शेतकऱ्यांना तात्काळ मदत न दिल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढू शकते. तात्काळ रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहिर करुन मदत करावी. अन्यथा सदर प्रकरणी आपण कोणतीही दखल न घेतल्यास रावेर तालुका शिवसेनापक्षातर्फे आंदोलने करण्याचा इशारा यावेळी निवेदनात केला आहे. यावेळी निवेदनावर जिल्हा उपसंघटक रविंद्र पवार, तालुका संघटक अशेाक शिंदे, अशेाक महाजन, युवासेना शहरप्रमुख राकेश घोसडे, शहर उपप्रमुख गोपाल सुतार, शाख प्रमुख चेतन कद, शहर प्रमुख कुणाल बागरे, प्रशांत धनगर, पिंटू माळी, कुणाल सुर्यवंशी, विकास शिंदे, राम शिंदे, प्रविण भोई, पंकज घोसडे यांच्यासह आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content