जळगाव प्रतिनिधी । दिव्यांग असतांनाही हिंमत न हारता अमरावती येथील गणेश कुमार हे सायकलींच्या माध्यमातून कोरोनाबाबत करत असलेली जनजागृती ही अतिशय कौतुकास्पद असून युवकांना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. गणेश कुमार यांच्या कार्याला आर्थिक पाठबळ देऊन त्यांची त्यांच्या कार्याचा गौरव केला.
अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका येथील दिव्यांग गणेश कुमार हे राईट टू फाईट कोरोना मिशन घेऊन देश भ्रमंती करून परत आपल्या गावी जात असतांना जळगावात दाखल झाले आहेत. देशात कोरोनाचा संसार्गात वाढ होऊ नये यासाठी जनजागृती करण्यासाठी गणेश कुमार हा युवक मागील २ महिन्यांपासून देशातील प्रत्येक राज्यात सायकलीवर प्रचार करीत आहे. त्याने महाराष्ट्र दिन १ मे रोजी आपले मिशन सुरु केलेले असून आज ते जळगावात आहेत. या अनुषंगाने जळगावात सायकलींगची चळवळ रूजविणारे जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी गणेश कुमार यांची पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची भेट घालून दिली.
ना. गुलाबराव पाटील यांनी गणेश कुमार यांचा सत्कार करून त्याला आर्थिक मदत केली. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी गणेश कुमार यांच्या जिद्दीचे कौतुक केले. ते म्हणाले की, कोरोनाच्या काळात भल्याभल्यांनी हिंमत सोडून दिली असता गणेश यांचा सारखा युवक हा दिव्यांग असतांनाही ज्या तडफेने जनजागृतीचे कार्य करतोय ते अतिशय कौतुकास्पद असून युवकांसाठी प्रेरणादायी आहे. समाजाने याचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, पंचायत समितीचे सर्व सदस्य, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, महानगर प्रमुख शरद तायडे, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, नगरसेवक गणेश सोनवणे, अमर जैन, नियोजनचे संशोधन अधिकारी अनिल सूर्यवंशी, यांची उपस्थिती होती.