जॉर्जिया (बटुमी) – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. अवघ्या १९ वर्षांच्या वयात नागपूरच्या दिव्या देशमुख हिने २०२५ च्या FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावत आपल्या नावावर मोठा मानाचा तुरा खोवला आहे. या विजयामुळे दिव्या ही महिला बुद्धिबळ विश्वविजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय ठरली असून, तिच्या या ऐतिहासिक कामगिरीने संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे.
जॉर्जियातील बटुमी शहरात पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत दिव्याने भारताची अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरु हम्पी हिला रोमहर्षक लढतीत पराभवाची धूळ चारली. मूळ सामना शनिवारी आणि रविवारी खेळला गेला. या दोन्ही दिवशीचे सामने अत्यंत तगडे आणि रोमांचक झाले होते. हम्पीने आपला अनुभव पणाला लावत दिव्याला आघाडी घेण्याची संधी दिली नाही, त्यामुळे सामना १-१ गुणांनी बरोबरीत राहिला.

आज, सोमवारी निर्णायक ठरलेल्या रॅपिड राउंडमध्ये दिव्याने पहिल्या गेममध्ये पांढऱ्या सोंगट्यांसह आक्रमक खेळ करत हम्पीसोबत बरोबरी साधली. दुसऱ्या गेममध्ये काळ्या सोंगट्यांसह खेळताना मात्र दिव्याने सुरुवातीपासूनच पूर्ण नियंत्रण राखले आणि रणनीतीचा सुरेख वापर करत हम्पीला हार पत्करायला भाग पाडले. जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानी असलेल्या दिव्याने जागतिक पाचव्या क्रमांकावरील हम्पीला पराभूत करणे ही मोठी कामगिरी मानली जात आहे.
या सामन्याविषयी बोलताना तज्ज्ञांनी दिव्याच्या तयारीचे कौतुक केले आहे. भारताचे माजी विश्वविजेते ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांनी सामन्यापूर्वीच भाकीत केले होते की, हम्पीचा अनुभव जरी वाखाणण्याजोगा असला तरी मानसिकदृष्ट्या मजबूत असलेली दिव्या जिंकण्याची शक्यता अधिक आहे. हे भाकीत अखेर खरे ठरले. विशेष बाब म्हणजे दोन्ही भारतीय महिला बुद्धिबळपटूंनी चीनच्या अव्वल खेळाडूंना नमवून अंतिम फेरी गाठली होती, ही बाबही अत्यंत गौरवास्पद आहे.
या विजयानंतर दिव्या देशमुखला सुमारे ४२ लाख रुपयांची पारितोषिक रक्कम मिळणार आहे, तर उपविजेती कोनेरू हम्पीला ३५,००० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे ३० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय, दोघींनाही अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत खेळण्याची पात्रता प्राप्त झाली आहे. या विजयामुळे त्यांना अधिकाधिक प्रायोजक मिळण्याची शक्यता असून, भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात महिलांसाठी नव्या युगाची सुरुवात झाल्याचे संकेत मिळत आहेत.
दिव्या देशमुखचा हा ऐतिहासिक विजय हा केवळ एक वैयक्तिक कामगिरी नाही, तर भारतीय महिला बुद्धिबळाच्या भविष्यासाठी एक प्रेरणादायी टप्पा आहे. तरुणाईच्या प्रतिनिधित्वाने बुद्धिबळात भारताची ताकद अधिक ठळक होत आहे.



