यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या “जिल्हा परिषद आपल्या दारी” या अभिनव उपक्रमांतर्गत यावल येथे तालुका स्तरीय तक्रार निवारण सभेचे आयोजन सोमवार, दिनांक २३ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत करण्यात आले आहे. ही सभा यावल पंचायत समिती कार्यालयात होणार असून, नागरिकांच्या विविध तक्रारी आणि अडचणींचे त्वरित निवारण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती यावेळी राहणार आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे प्रशासनाशी संबंधित प्रलंबित तक्रारींचे निरसन थेट स्थानिक पातळीवरच करणे. त्यामुळे नागरिकांना जळगाव येथील जिल्हा परिषद कार्यालयात वारंवार जाण्याची आवश्यकता भासत नाही. वेळ, पैसे आणि मनस्ताप यापासून नागरिकांची सुटका होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजात गतिमानता येत असून लोकसहभागही मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे.

तक्रार निवारण सभेमध्ये जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष सहभागी होणार असून, नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यावर तत्काळ निर्णय घेण्याचे आणि योग्य त्या सूचनांचे पालन करण्याचे काम केले जाणार आहे. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक आर.एस. लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, भाऊसाहेब अकलाडे, बालकल्याण अधिकारी हेमंत भदाणे, जलसंधारण अधिकारी अमोल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, कार्यकारी अभियंता सुनील पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबूलाल पाटील, समाजकल्याण अधिकारी विनोद चावरिया, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि आपल्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडून त्याचे त्वरित निवारण करून घ्यावे. यामुळे लोकांचे विश्वास वाढेल आणि प्रशासनाशी जोडलेपण अधिक दृढ होईल.



