रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरात आरोग्यास गंभीर धोका ठरू शकणाऱ्या गुटख्याची खुलेआम विक्री सुरू असल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, हा गुटखा महाराष्ट्रात बंदी असूनही, मध्य प्रदेशातून आलेला संजय नावाचा व्यापारी रोजच्या रोज गुटखा विक्री करत आहे. या प्रकारामुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, संजयवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
संजय हा व्यापारी दररोज गुटख्याचा डबा मोटरसायकलवर घेऊन रावेरमध्ये येतो. तो ग्राहकांकडून आधीच ऑर्डर घेतो आणि त्यानुसार ठराविक ठिकाणी गुटखा पोहोचवतो. या पद्धतीने तो महाराष्ट्रातील कायद्याचे खुलेआम उल्लंघन करत असून, आरोग्यावर घातक परिणाम करणाऱ्या उत्पादनाची विक्री करत आहे. महाराष्ट्र शासनाने गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली असताना, या प्रकाराने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
गुटखा विक्रीमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव असतानाही व्यापारी संजय याच्या वागणुकीकडे प्रशासन डोळेझाक करत असल्याचे चित्र नागरिकांना खटकले आहे. स्थानिकांनी संजयविरोधात संताप व्यक्त करत प्रशासनाला खबरदारी घेण्याची मागणी केली आहे.
अनेक नागरिकांनी प्रशासन, पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार केली असून, संबंधित व्यापाऱ्यावर छापा टाकून कठोर कारवाई व्हावी, अशी एकमुखी मागणी आहे. जर तातडीने पावले उचलली नाहीत, तर इतर ठिकाणीही अशाच प्रकारे गुटख्याची विक्री वाढण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, लवकरच कारवाई होईल अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे. आरोग्याचा प्रश्न आणि कायद्याची अंमलबजावणी हे दोन्ही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेता, अशा बेकायदेशीर विक्रेत्यांवर तातडीने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.