फैजपूर (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या आमोदे ग्रामपंचायत सदस्य गणेश शंकर कपले यांच्यावर शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेची कार्यवाही केली आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, आमोदे गावातील ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा भूमापन क्रमांक ४८२/१ मध्ये २०० पत्रांचे पत्री शेड टाकून अतिक्रमण केल्याप्रकरणी विजय सिताराम अभंग यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम (ज-३) अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आमोदा गावात खळबळ उडाली आहे. तत्कालीन उपसरपंच तथा सत्तारूढ सदस्य गणेश कपले यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून गावातील मुख्य रस्त्यावर शिवशंकर इंडस्ट्रीज या नावाने धान्य सफाईचा उद्योग सुरू केला. याठिकाणी ग्रामपंचायतच्या ओपन स्पेसमध्ये सन २०११ पासून पत्रिशेड टाकून जागेवर अतिक्रमण केले होते. याविरोधात दिनांक ७ डिसेंबर २०१५ रोजी येथील रहिवासी तथा ग्रा.पं. सदस्य विजय सिताराम अभंग यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज केला होता. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सुनावणी करून कपले यांचे ग्रामपंचायत सदस्यपद रद्द केले आहे. गेल्या चार वर्षापासून राजकीय दबावामुळे कारवाई करण्यात येत नव्हती आणि चौकशी वर चौकशीचा कांगावा अधिकाऱ्यांकडून करण्यात येत होता. तब्बल चार वर्षांनंतर श्री. कपले यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे गावात युवकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. या कारवाईनंतर दोनशे पत्रांच्या शेडचे अतिक्रमण केव्हा काढण्यात येईल ? याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.