जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज – जिल्हाधिकारी ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.

काल केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. यानुसार जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघांमध्ये २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी ते म्हणाले की, जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी ते स्वत: तर रावेरसाठी अपर जिल्हाधिकारी डॉ. गोरक्ष गाडीलकर हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. याप्रसंगी त्यांनी या दोन्ही मतदारसंघासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

यावेळी बोलतांना डॉ. ढाकणे म्हणाले की, जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी जिल्ह्यात 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. याबाबतची अधिसूचना 28 मार्च, 2019 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिनांक 4 एप्रिल असून नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 एप्रिल रोजी होणार आहे. तर उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक 8 एप्रिल असून मंगळवार, 23 एप्रिल, 2019 रोजी मतदान होणार होईल. तर गुरुवार, 23 मे, 2019 रोजी मतमोजणी होणार आहे. जळगाव लोकसभा मतदार संघासाठी 1960 मतदान केंद्र असून 53 सहाय्यकारी मतदान केंद्र असणार आहे. या मतदार संघात 19 लाख 09 हजार 735 इतके मतदार आहेत. यामध्ये 10 लाख 1 हजार 249 पुरुष तर 9 लाख 8 हजार 427 महिला तर 59 इतर मतदारांचा समावेश आहे. तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी 1872 मतदान केंद्र असून 87 सहाय्यकारी मतदान केंद्र असणार आहे. या मतदार संघात 17 लाख 60 हजार 175 इतके मतदार आहेत. यामध्ये 9 लाख 17 हजार 488 पुरुष तर 8 लाख 42 हजार 661 महिला तर 26 इतर मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात 7 हजार 393 पुरुष तर 59 महिला असे एकूण 7452 सैनिक मतदार
असल्याचेही डॉ. ढाकणे यांनी सांगितले.

लोकसभा निवडणूकीसाठी जिल्ह्याकरीता 8 हजार 17 बॅलेट युनिट, 4 हजार 583 कंट्रोल युनिट तर 4 हजार 927 व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध आहे. निवडणूकीसाठी जिल्ह्यात 30 हजार 370 अधिकारी, कर्मचारी आवश्यकता असून 32 हजार 529 इतके मनुष्यबळ उपलब्ध आहे. जळगाव लोकसभा मतदार संघासाठी 172 व रावेर लोकसभा मतदार संघासाठी 192 असे एकूण 364 क्षेत्रिय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारांच्या मदतीसाठी 1950 हा टोल फ्री क्रमांक जिल्हास्तरावर कार्यरत करण्यात आहे. आचार संहितेची प्रभावीपणे अंमजबजावणी होण्यासाठी तसेच खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे C-vigil ॲपचाही वापर करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर आचारसंहिला अंमलबजावणी, मतदान यंत्रे, मतदार जागृती व प्रशिक्षण, मनुष्यबळ व्यवस्थापन, खर्च व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थापन, दिव्यांग मतदार व्यवस्थापन आदिंसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पहा : जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी दिलेली माहिती.

Add Comment

Protected Content