केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप

जळगाव प्रतिनिधी । येथील केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे आज नववी ते बारावीच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.  

हा कार्यक्रम हरिविठ्ठल नगर व मांगीलाल बाफना नेत्रपेढी, आचार्य भवन नवी पेठ येथे झाला. प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक क्षेत्रातील विशेष मार्गदर्शन वर्ग हा प्रकल्प गेल्या १७ वर्षांपासून कार्यरत आहे. या प्रकल्पाचे माध्यमातूनच इयत्ता पाचवी ते आठवीच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणी वर्ग घेतले जातात. ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शालेय पाठ्यपुस्तके घेता येत नाही अशा इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके “आम्हालाही शिकायचे आहे” या उपक्रमांतर्गत पाठ्यपुस्तक सहयोग योजना गेल्या ७ वर्षापासून राबविण्यात येत आहे. 

आज हरिविठ्ठल नगर, खंडेराव नगर, राजीव गांधी नगर, शनिपेठ, कांचन नगर, चौघुले प्लॉट या भागातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून भुलरोग तद्न्य डॉ. सोनाली महाजन, बळवंत नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक संजय कासार, संचालिका संगीता नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी जयदिप शहा, हरी विठ्ठल नगर येथील मारुती मंदिराचे विश्वस्त लालचंद भिल यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. सोनाली महाजन यांनी समायोचित भाषणात विद्यार्थ्यांना जिवनात मोठे होऊन यशस्वी होण्याचा मार्ग सांगितला. तसेच आत्तापासूनच आपल्या अभ्यासाची ध्येय निश्चित करणे आवश्यक असल्याचे सांगत केशवस्मृती प्रतिष्ठानने गरिब, गरजु मुलांना सहकार्याची जी भावना निर्माण केली आहे, ती कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

सविता नाईक यांनी स्वयं-अध्ययन कसे करावे असे सांगितले. या उपक्रमासाठी बळवंत नागरी सहकारी पतसंस्था यांचे आर्थिक सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशवस्मृतीचे प्रशासकीय अधिकारी सागर येवले यांनी केले तर यशस्वितेसाठी राजश्री डोल्हारे, स्नेहा तायडे, किशोर गवळी, परेश शिकरवार, गोपाळ तगडपल्लेवार, राधिका गरुड, ज्योती बारी, मंगला अहिरे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content