फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमोदे येथील घनश्याम काशीराम विद्यालयात आज सतपंथ मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना धावण्याच्या शर्यतीमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी स्पोर्ट शूजचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उमेश दादा पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सतपंथ मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त केवल महाजन खडका व संजीव किसन महाजन चिनावल यांची उपस्थिती होती. मागील काही महिन्यात यावल तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यात घ.का. विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी धावणे या क्रीडा प्रकारात सहभाग घेतलेला होता. तेथे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे व द्वितीय क्रमांकाचे यश संपादन केले होते. यावेळी विद्यार्थी विना शूजचे धावत असतानाचे फोटो पाहिले असता सदरील बाब मुख्याध्यापक व चिटणीस प्रा. उमाकांत पाटील यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सदरची बाब लक्षात घेऊन सतपंथ मंदिर ट्रस्टचे प्रमुख आचार्य जनार्दन हरीजी महाराज यांना सांगितली.
त्यांनी ट्रस्टच्या वतीने शाळेसाठी विद्यार्थ्यांना स्पोर्ट शूज देण्याचे सुचित केले व त्यानुसार शूज वाटपचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांचा सत्कार विद्यार्थी चि. जयवीर महाले व कुमारी जान्हवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमासाठी संस्थेचे शालेय समिती चेअरमन ललित महाजन, सदस्य सुभाष महाजन व प्रमोद वाघुळदे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. उमाकांत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन एल. पी. पिंपरकर यांनी तर विश्वस्तांचे व मान्यवरांचे आभार मुख्याध्यापक एस. बी. बोठे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.