चाळीसगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर तालुक्यातील बोढरे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अवादा सोलार ग्रृपतर्फे मास्क व सॅनिटाझरचे वाटप ग्रामपंचायतीनचे सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते मंगळवार रोजी सकाळी करण्यात आले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यात ग्रामीण भागात रूग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे तालुक्यातील बोढरे गावात कोरोनाबांधीतांची संख्या गडद होऊ नये म्हणून शिवारातील अवादा सोलार ग्रृपने सामाजिक भान जोपासत गावात मास्क व सॅनिटाझचे वाटप केले. यावेळी मास्क व सॅनिटाझचे वाटप सरपंच गुलाब राठोड व उपसरपंच अर्जून राठोड यांच्या हस्ते सकाळी करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमामुळे अवादा सोलार कंपनीचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी ४ हजार मास्क व २ हजार सॅनिटाझचे बॉटल वाटप करण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गावात दोन दिवस कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. गावात विना मास्क धारक आढळून आल्यास ५०० रूपये दंड ठोठावण्यात येतील असे सुतोवाच सरपंचांनी केले आहे. मास्क व सॅनिटाझर वाटपाप्रसंगी सरपंच गुलाब राठोड, उपसरपंच अर्जून राठोड, ग्रामपंचायत सदस्य पुनमचंद जाधव, प्रेम चव्हाण, एकनाथ बर्वे व चाळीसगाव ग्रामीण विजाभज आघाडी सरचिटणीस अविनाश राठोड आदी उपस्थित होते.