जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौकात भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन आणि युवाशक्ती फाउंडेशनने संयुक्त विद्यमाने यंदा आदर्श गणेशोत्सव साजरा केला. या मंडळाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा एक अनोखा संदेश दिला. यंदाच्या गणेशोत्सवात त्यांनी बल्लाळेश्वर गणपतीची सजीव प्रतिकृती रोपांच्या मदतीने तयार केली होती, जे उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरले.
एक हजार रोपांचे वाटप
अनंत चतुर्दशीच्या दिवशी, गणेश विसर्जन सोहळ्याच्या वेळी, मंडळाने एका कुटुंबाला एक याप्रमाणे रोपांचे वाटप केले. नागरिकांनी ही रोपे प्रसाद म्हणून घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. कुंड्यांसकट एकूण एक हजार रोपांचे वाटप यावेळी करण्यात आले. या उपक्रमामुळे नागरिक त्यांच्या घरात रोपे लावून पर्यावरणाची काळजी घेतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली.

उपक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
या उपक्रमाला जैन इरिगेशनचे अनिल जोशी, मंगलसिंग राठोड, देवेंद्र पाटील, आणि युवाशक्ती फाउंडेशनचे विराज कावडिया यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी मंडळाच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. अशाप्रकारे, धार्मिक सण साजरा करतानाच सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारीचे भान राखणे आवश्यक आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.



