यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय जागेवर अतिक्रमण करून केलेले बांधकाम केल्याप्रकरणी तालुक्यातील कासवा येथील ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अपात्र केले आहे.
याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील कासवा ग्रामपंचायत सदस्य लताबाई पंढरीनाथ सपकाळे व पवन पंढरीनाथ कोळी यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून शासकीय जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केल्याची तक्रार येथील विनोद श्रावण कोळी यांनी केली होती. यासंदर्भात यावल तालुका प्रशासनाने तक्रारीची चौकशी केली असता दोन्ही ग्रामपंचायत सदस्यांनी अतिक्रमण करून बांधकाम केल्याचे दिसून आले. त्यानुसार तालुका प्रशासनाने अहवाल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना सादर केला होता. या नुसार कासवा ग्रामपंचायत सदस्य लताबाई पंढरीनाथ सपकाळे व पवन पंढरीनाथ कोळी यांना ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14 ज 3 नुसार ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास अपात्र घोषित करण्यात आले आहे. या संदर्भात पत्र उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी यावल गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही ग्रामपंचायत सदस्यांना अतिक्रमण केल्यामुळे आपले पद सोडावे लागणार आहे.