लसीकरण केंद्रावर गर्दीमुळे वाद ; कोरोना प्रसार वाढण्याची भीती

भुसावळ, प्रतिनिधी । लसीकरण केंद्रांवरील गर्दी आणि वादांमुळे कोरोना लसीकरणात  व्यत्यय येत आहे . गर्दी आवरणे आणि वाद वाढू नये म्हणून समजावण्यात कर्मचाऱ्यांचा वेळ जात असल्याने तेथूनच कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती व्यक्त होत  आहे  

 

शहरात १ मेपासून १८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाचा टप्पा सुरू करण्यात आला आहे. लसीकरणाची यंत्रणा पाहता यंत्रणेच्या तुलनेत लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. केंद्रावर पहाटेपासून मोठी रांग लागत असून, वाद निर्माण होत आहे. त्यामुळे यंत्रणेवर ताण वाढू लागला आहे. केंद्रावर कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याचे निदर्शनास येत आहे. केंद्रांवर होणाऱ्या गर्दीतूनच कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत याठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. तसे न झाल्यास लसीकरण केंद्र संसर्गाचा केंद्रबिंदू होतील, असा धोका दिसून येत आहे.

 

लसीकरण केंद्रावर वाढती गर्दी लक्षात घेता, योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. यामध्ये लसीचा पुरवठा वाढविणे, प्रत्येक येणाऱ्या नागरिकांची प्राथमिक तपासणी करणे, होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेणे, सोशल डिस्टन्सिंग पालन करणे, सामाजिक संस्थांची मदत घेणे, अन्य सुरक्षिततेच्या उपायांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

 

शहरातील बद्री प्लॉट व महात्मा फुले आरोग्य केंद्राबाहेर पहाटे ५ वाजेपासून रांगा लागत आहे. यात १८ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या युवकांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. आरोग्य केंद्रावर गेल्यावरच नाव नोंदणी केली जाईल, असे युवकांना वाटल्याने सोबत आधारकार्ड घेऊन बहुतांश युवक लसीकरणासाठी केंद्रावर आले. मात्र ऑनलाईन नोंदणी असलेल्या युवकांनाच लसीकरण केले जाणार असल्याचे कळताच ते माघारी  परतले. महात्मा फुले आरोग्य केंद्रावर कोविडचा पहिला डोस मिळाला असला तरी कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस न आल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला.

Protected Content