Home प्रशासन नगरपालिका चुंचाळे ग्रामपंचायतीच्या जागेवरील अतिक्रमणाचा वाद चिघळला  

चुंचाळे ग्रामपंचायतीच्या जागेवरील अतिक्रमणाचा वाद चिघळला  

0
65

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक जागेवरील कथित अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गावातील रहिवासी मुबारक नवाब तडवी यांनी ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदन देत सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी केली आहे. या तक्रारीची दखल घेत ग्रामपंचायतीने संबंधित व्यक्तीस दुसऱ्यांदा नोटीस बजावली असली, तरीही अतिक्रमित जागेवरील बांधकाम सुरूच असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुबारक नवाब तडवी यांनी १४ जून २०२६ रोजी ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदन सादर करून सार्वजनिक जागेवर सुरू असलेल्या बांधकामाकडे लक्ष वेधले होते. यापूर्वीही त्यांनी याच विषयावर ग्रामपंचायतीकडे अनेकदा लेखी तक्रारी व अर्ज सादर केले होते. त्या अनुषंगाने ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या स्वाक्षरीने संबंधित व्यक्तीस प्रथम नोटीसही देण्यात आली होती. मात्र, नोटीस देऊनही अतिक्रमण हटविण्यात आले नसून जागेवर पक्के बांधकाम सुरूच असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. ग्रामपंचायतीने नुकतीच संबंधित व्यक्तीस दुसरी नोटीस बजावत सात दिवसांच्या आत सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले आहेत. नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, यापूर्वी ६ एप्रिल २०२६ रोजी प्रथम नोटीस देऊन १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही अतिक्रमण कायम असल्याचे निदर्शनास आल्याने ही द्वितीय नोटीस देण्यात आली असून, सात दिवसांच्या आत अतिक्रमण न काढल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, दुसरी नोटीस बजावूनही कोणतीही ठोस हालचाल होत नसल्याचा आरोप मुबारक नवाब तडवी यांनी केला आहे. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या भूमिकेबाबत गावात विविध चर्चा सुरू झाल्या असून, अतिक्रमणाविरोधात प्रत्यक्ष कारवाई होणार की हा विषय पुन्हा कागदोपत्रीच राहणार, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

चुंचाळे ग्रामपंचायत यापूर्वीही विविध तक्रारी आणि वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत राहिली आहे. आता सार्वजनिक जागेवरील कथित अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा समोर आल्याने ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ग्रामपंचायतीने दिलेल्या दुसऱ्या नोटीशनंतर संबंधित व्यक्ती बांधकाम थांबवते का, अतिक्रमण हटविले जाते का किंवा प्रशासन कायदेशीर कारवाई करते का, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मुबारक नवाब तडवी यांनी पत्रकारांशी बोलताना असा आरोप केला की, दुसरी नोटीस दिल्यानंतरही कोणतीही प्रभावी कारवाई होताना दिसत नसल्याने ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण होत आहे. मात्र, या आरोपांबाबत संबंधित ग्रामपंचायत प्रशासन किंवा नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तीची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.


Protected Content

Play sound