जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मराठा समासाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी मराठा प्रीमियम लीग यासह इतर मराठा समाजाच्या विविध संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना बुधवार १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पोलीस निरीक्षक एखादा समाजाबद्दल अतिशय खालच्या पातळीवर आक्षेपार्ह वक्तव्य करून संपूर्ण समाजाच्या भावना दुखावल्या आहे. एखाद्या जबाबदार अधिकाऱ्याच्या मनात जर समाजाबद्दल इतका द्वेष व राग राहत असेल तर अशा अधिकाऱ्यांकडून सामाजिक न्यायाची व सुव्यवस्थेची काय अपेक्षा करता येईल. आपल्या पदाचा दुरुपयोग करून मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासनाने तातडीने पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले आणि त्याला समर्थन देणारे पोलीस कर्मचारी अशोक महाजन यांना त्वरीत कायमस्वरूपी पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, विनोद देशमुख, उपमहापौर कुलभूषण पाटील, संतोष मराठे, मंगला पाटील, रेखा पाटील, मुकुंद सोनवणे, वाल्मिक पाटील, मुकुंद सपकाळे यांच्यासह मराठा समाज बांधव व मराठा समाज संघटनेचे पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.