जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील किनगाव येथील रहिवासी आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री विजय पाटील यांची कन्या कु. दिशा विजय पाटील हिने राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. भरतपूर, राजस्थान येथे २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत आयोजित ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’मध्ये दिशा पाटीलने बॉक्सिंग क्रीडा प्रकारात सलग दुसऱ्या वर्षी सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना दिशाने ६३ किलोग्रॅम वजनी गटातील अंतिम सामन्यात दमदार खेळ दाखवला. हरियाणाच्या बॉक्सरवर तिने ५-० अशा एकतर्फी फरकाने मात करत सुवर्णपदकाची शानदार कमाई केली. तिच्या या विजयाने तिचे कौशल्य, जिद्द आणि उत्कृष्ट खेळाची चमक पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

भव्य स्वागत आणि अभिनंदन दिशाच्या सुवर्णपदकाच्या विजयाची बातमी कळताच आज सकाळी जळगाव रेल्वे स्टेशनवर मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी तिचे जंगी स्वागत केले. मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष शिवश्री सुरेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष शिवश्री राम पवार, ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश पाटील, मधुकर पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री हिरामण चव्हाण, कार्यकारिणी सदस्य संदीप सोनवणे आणि पंकज गरुड यांच्यासह अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शाल, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ भेट देऊन ‘शिवशुभेच्छां’सह तिचे अभिनंदन केले.
दिशाच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे केवळ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचाच नव्हे, तर खान्देश आणि यावल तालुक्यातील किनगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर उजळून निघाले आहे. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचा मान-अभिमान अधिक उंचावणाऱ्या या सुवर्णमय कामगिरीबद्दल दिशावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



