बीड वृत्तसंस्था । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. मराठवाड्यात ओला दुष्काळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी ते आले आहेत. परळी येथील गोपीनाथ गडावर दर्शनासाठी येत असल्यामुळे धनुष्यबाण आणि भाजपचं कमळ यांची एकत्रितरित्या रांगोळी काढण्यात आली आहे. दिवंगत ने गोपीनाथ मुंडेंच्या समाधीस्थळी रेखाटलेली कमळ आणि धनुष्यबाणाची रांगोळी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ‘आठवण साहेबांची’ असे भावनिक शब्दही लिहिण्यात आले आहेत. या रांगोळीवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राज्यात सत्ता स्थापनेवरून भाजप-शिवसेनेत गोंधळ सुरू असताना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीवरील या रांगोळीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. फुलांच्या रांगोळीच्या बाजुला ‘आठवण साहेबांची’ असे लिहिले आहे. दरम्यान, दोन्ही मुंडे भगिनी परळीमध्ये नाहीत तर त्या मुंबईत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, शिवसेना-भाजपमधील सत्तास्थापनेचा संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजू आक्रमकपणे लावून धरली असताना मात्र, भाजप स्वबळावर सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेशी चर्चेच्या प्रतीक्षेत असलेल्या भाजपला सत्ता स्थापनेची घाई नाही. चर्चेची दारं शिवसेनेकडून बंद असल्याने भाजप प्रतिसादासाठी शेवटच्या क्षणापर्यंत ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे.
दुसरीकडे, राज्यात राष्ट्रपती लागवट लागू होण्याच्या दिशेने सर्व पक्षीयांची वाटचाल सुरू आहे. येत्या 8 नोव्हेंबरला रात्री 12 वाजता सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ संपून नवी विधानसभा अस्तित्वात येईल. सत्तास्थापनेबाबत भाजप-शिवसेनेत तोडगा निघाला नाही तर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. केंद्रात भाजपचे सरकार असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास भाजप श्रेष्ठी निवांत असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.