कासोदा, ता.एरंडोल (प्रतिनिधी) येथे वीज वितरण कंपनीचे आठ ते दहा हजार ग्राहक आहेत तरीही एवढ्या मोठ्या गावात वीज वितरण कंपनीचे वीज बिल भरणा केंद्रच नाही, ही शोकांतिका आहे. वीज वितरण कंपनीला देखील याचे काही सोयरसुतक दिसत नाही, वीज ग्राहक पैसे घेऊन फिरत आहेत परंतु त्यांना वीज बिल भरणा केंद्र सापडत नाही ही खेदाची बाब आहे.
कासोदा गावात भलेमोठे ३२ के.व्ही.चे सबस्टेशन आहे. ग्राहकांची संख्या व वीज कंपनीचा परिसर हा जवळपास १० ते १२ खेड्यांचा असल्याने वीज बिलाची वसुलीही मोठ्या प्रमाणावर होते. गावातले वीज बिल भरणा केंद्र गावाच्या एका टोकाला वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आहे. त्या ठिकाणी कंपनीचे कर्मचारी एरंडोल येथून येतात व वीज बिलाची रक्कम स्वीकारतात. हे केंद्र दूर असल्याने तेथे अबालवृद्धांना किंवा लहान बालकांना जाणे अवघड होते. तेथे गेल्यावर बिलाच्या रकमेचा भरणा होईलच याचीही शाश्वती देता येत नाही. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून या ठिकाणाचे वीज बिल वसुली केंद्र बंद पडल्याने नवीन केंद्रासाठी काही प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. पर्यायाने थकबाकी वाढण्याचे प्रमाण वाढत आहे. यासाठी वीज वितरण कंपनीने याची दखल घेवून गावात त्वरित वसूली केंद्र सुरू करावे, अशी अपेक्षा सर्वत्र होत आहे. अन्यथा ग्राहक बिल भरणा न करण्याचा पवित्रा घेण्याची शक्यता आहे. सध्या गावात फक्त बुलढाणा अर्बन बँकेत बिल भरण्याची सुविधा आहे, परंतु ती फक्त ऑनलाइन असल्याने ”जर वीज वितरण कंपनीची वेबसाइट बंद पडली तर आम्ही काहीच करू शकत नाही” असे शाखा व्यवस्थापकांचे म्हणणे आहे.