चाळीसगावात घाणीचे साम्राज्य : डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ (व्हिडीओ)

chalisgaon kachara

चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे या घाणीमध्ये अधिकच वाढ झाली आहे. यातून अनेक प्रकारचे डास मच्छर निर्माण होत असल्याने शहरात साथीच्या आजारांची लागण वाढली आहे. डेंग्यू या भयंकर आजाराच्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. शहरातील सर्वच रुग्णालयांमध्ये डेंगूचे रुग्ण पहावयास मिळत आहेत.

 

शहरातील बस स्टँड भागातील झोपडपट्टीजवळ मांस विकणाऱ्या अनेक दुकानांची मोठी गर्दी असून या भागात असणाऱ्या नाल्यामध्येच हे व्यवसायिक बोकड आणि कोंबडी कापून त्याची घाण टाकत असल्याने इथे डुकरांचीही संख्या वाढलेली आहे. अशीच परिस्थिती नागद रोड झोपडपट्टी भागातही आहे. शहरातून वाहणाऱ्या डोंगरी तितुर नदीमध्येही प्रचंड घाण साचली असून रोग निर्मिती करणाऱ्या डासांचे प्रमाण वाढले आहे. नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढत्या शहराच्या दृष्टीने कमी पडत असल्याने आरोग्य यंत्रणा निकामी ठरत आहे. त्यातच न.पा.ने ठेकेदारी पद्धतीने शहरात कचरा संकलनासाठी सुरु केलेल्या घंटागाड्या संपूर्ण शहरात वेळेवर पोहोचत नसल्याने नागरिकांना नाईलाजाने उघड्यावर कचरा टाकावा लागत असल्याने घाणीत वाढ होत आहे. याकडे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता असून नागरिकांनीही आपल्या आरोग्याच्या काळजीसाठी रस्त्यावर कचरा न टाकता परिसर स्वच्छ ठेवून साथीचे आजार कमी होण्यास सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.

 

 

Protected Content