Home धर्म-समाज मनवेल येथे ४ ऑक्टोबरला धुनीवाले दादाजींचा श्राद्ध सोहळा ; लाखो भाविकांची उपस्थिती...

मनवेल येथे ४ ऑक्टोबरला धुनीवाले दादाजींचा श्राद्ध सोहळा ; लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित

0
8

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेवानंद स्वामी गुरु केशवानंद धुनीवाले दादाजींचा श्राद्ध सोहळा रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी यावल तालुक्यातील मनवेल येथील धुनीवाले दादाजी दरबारात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे.

४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता आरतीने कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी ८ वाजता सेवा, सकाळी १० वाजता होम, हवन व सेवा, तर दुपारी १२ वाजेपासून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून, रात्री ८ वाजता महाआरती होईल. त्यानंतर रात्रभर विविध ठिकाणांहून आलेल्या दादाजी भक्तांकडून भजन-गायनाचे कार्यक्रम होणार आहेत. श्राद्ध सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनवेल ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांकडून गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. विविध ठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या असून, धुनीवाले दादाजींचे भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण मनवेल परिसर भक्तिमय आणि भगवामय वातावरणाने सजला आहे.या धार्मिक सोहळ्यास महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील धुनीवाले दादाजींचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. तसेच विविध क्षेत्रातील अधिकारी, राजकीय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीही दरबारात दर्शनासाठी भेट देऊन महाप्रसादाचा लाभ घेतात. त्यामुळे सोहळ्यादरम्यान मनवेलमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

श्री रेवानंद स्वामी यांनी मनवेल येथे दीर्घकाळ वास्तव्य केल्याची भक्तांची श्रद्धा आहे. भाद्रपद महिन्यातील अविधवा ज्येष्ठ वैद्य नवमीच्या दिवशी १९३९ मध्ये मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील अंबाडा येथे तापी नदीच्या काठावर त्यांनी समाधी घेतल्याचे सांगितले जाते. त्यापूर्वी श्री रेवानंद स्वामी यांनी मनवेल येथे सुमारे १८ वर्षे वास्तव्य केले होते. त्यांच्या वास्तव्याच्या स्मृती आणि भक्तीपरंपरेतून मनवेल येथे दरवर्षी श्राद्ध सोहळा उत्साहात साजरा केला जातो. भक्तांच्या श्रद्धेनुसार, श्री रेवानंद स्वामी यांनी खानदेशातील भाविकांना श्री दादाजी धुनीवाले महाराज आणि श्री हरिहरजी भगवान यांच्या महिमेची माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक भाविक श्री बडे दादाजी आणि श्री छोटे दादाजी यांच्या नामस्मरणाशी जोडले गेले. स्वामीजींच्या मनवेल येथील वास्तव्याशी संबंधित विविध आठवणी आणि धार्मिक परंपरा आजही भाविकांकडून जपल्या जात आहेत.

मनवेल परिसरात स्वामीजींच्या अनेक लीला घडल्याची भक्तांची श्रद्धा असून, त्यांच्याशी संबंधित भजनमाला आजही भाविकांकडे असल्याचे सांगितले जाते. महादेव मंदिरासमोर धर्मध्वज लावण्याची परंपराही याच श्रद्धेशी जोडली जाते. स्वामीजींच्या कृपाशीर्वादामुळे मनवेल आणि परिसर सुजलाम-सुफलाम झाल्याची भावना भाविकांमध्ये आहे. श्राद्ध सोहळ्यातील महाप्रसादामध्ये वरण-पोळी आणि गंगाफळाच्या भाजीचा समावेश असतो. मनवेल येथील गंगाफळाची भाजी विशेष प्रसिद्ध असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. तसेच दिवसभर भाविकांसाठी साकळी परिसरातील समाजसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने फराळ व चहाची व्यवस्था केली जाते.

या निमित्ताने सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात येणार आहे. तसेच साकळी ते मनवेलदरम्यान भाविकांसाठी मोफत प्रवासाची वाहन व्यवस्था करण्यात येते. या सेवेमुळे बाहेरून येणाऱ्या भाविकांना सोहळ्याला उपस्थित राहणे सुलभ होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमासाठी साकळी, शिरसाड, थोरगव्हाण, पथराडे, शिरागड, पिळोदा खुर्द आणि दगडी यांसह परिसरातील गावांमधील भाविकांचे सहकार्य लाभत आहे. धार्मिक कार्यक्रमांसोबत सामाजिक उपक्रम आणि भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्थ व सेवाभावी कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.


Protected Content

Play sound