धुळे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | धुळे तालुक्यातून बनावट देशी दारूचा कारखानाबाबत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे चार लाख तीस हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ६३ हजार ८४० रूपयांच्या देशी दारूच्या बाटल्या होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील वार शिवारातील एका इसमाच्या शेतातील घरामध्ये बनावट देशी दारूचा कारखाना चालवण्यात येत होता. पश्चिम देवपूर पोलिसांनी शेतातील घरात सुरू असलेला हा कारखाना उध्वस्त केला आहे. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कारवाई करत मंगळवारी रात्री एक वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील वार शिवारात महेंद्र राजाराम चव्हाण याच्या शेतातील घरावर छापा टाकला. पोलिसांनी वार शिवारातील शेतात धाड टाकली असता, पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये देशी दारुच्या बाटल्या भरल्याचं दिसून आले. या बाटल्यांनी भरलेले बॉक्स एकावर एक असे रचण्यात आले होते. तर, बाजुलाच बांधण्यात आलेल्या खोल्यांमध्ये बनावट दारु बनवण्याचे साहित्यही आढळून आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तेथील सर्वच अवैध व बनावट मद्यसाठा जप्त केला करून कारवाई करण्यात आली आहे.