धुळे प्रतिनिधी । धुळे जिल्ह्यात गत चोवीस तासांमध्ये एकाच दिवशी तब्बल ६०० कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून ही आजवरची उच्चांकी संख्या आहे. तर आजच आठ रूग्णांचा मृत्यू झाल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढते आहे. तसेच आता मृतांचा आकडाही वाढण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी दिवसभरात ६०० बाधित आढळले. तसेच आठ जणांचा मृत्यू झाला. त्यात साक्री येथील ३२ व ६६ वर्षीय महिला, शिरपूर येथील ५५ वर्षाची महिला व पुरुष, दोंडाईचा येथील अन्य एक पुरुषाचा समावेश आहे. याशिवाय देवपुरातील ७७ वर्षाचा पुरुष, शिरडाणे गावातील ७२ वर्षाचा पुरुष तर शहरातील ७९ वर्षाचा वृद्धाचा समावेश आहे. आजच्या रूग्णसंख्येनंतर जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ३२ हजार २८० तर मृतांची ४९४ इतकी झाली आहे.
तर दुसरीकडे धुळे शहरातही कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे दिसून आले आहे. एका दिवसात धुळ्यात १७९ नवे कोरोनाबाधित आढळून आले. शहरातील गोंदूररोड, दत्त मंदिर चौक, जय बजरंग कॉलनी, श्रीराम कॉलनी, स्वराजनगर, नकाणेरोड, बिजलीनगर, गांधीनगर, राजदीप नगर, नवजीवन सोसायटी, भोई सोसायटी, अजबेनगर, पार्वतीनगर, मालेगावरोड, पोलिस मुख्यालय विद्यानगर, वैभवनगर, इंदिरानगर, उन्नतीनगर, विद्युत प्रभा सोसायटी, शिवप्रताप कॉलनी, राजेंद्रनगर, नकाणे रोड, पद्मनाभनगर, शीतल कॉलनी, जलगंगा सोसायटी, राजरत्न नगर, आविष्कार कॉलनी, भागात पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.
कोरोनाच्या दुसर्या लाटेची तीव्रता सगळीकडे दिसून येत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. तर दिवसभरात झालेले आठ मृत्यू हे देखील प्रशासनाची चिंता वाढवणारे ठरले आहे.