नवी दिल्ली वृत्तसंस्था । टिम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा लवकरच सेवानिवृत्ती जाहीर करण्याची शक्यता असून यानंतर तो भाजपमध्ये दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भारतीय संघाचे विश्वचषक विजयाचे स्वप्न भंग पावल्यानंतर महेंद्रसिंग धोनी निवृत्ती जाहीर करण्याच्या चर्चेला जोर चढला आहे. अर्थात, धोनीने याबाबत काहीही भाष्य केलेले नाही. दरम्यान, याआधीच धोनी हा निवृत्तीनंतर राजकीय मैदानात उतरण्याची माहिती समोर आलेली आहे. माजी केंद्रीय मंत्री संजय पासवान यांनी याबाबतचे सूतोवाच केले आहे. त्यांच्यानुसार भाजपमध्ये प्रवेशाबाबत धोनीशी आधीच संपर्क साधण्यात आला असून त्याने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. असे झाल्यास भाजपला लाभ होण्याची शक्यता आहे. विशेषत: झारखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकीत धोनी हा पक्षाचा चेहरा ठरू शकतो. विशेष बाब म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी गत वर्षी संपर्क से समर्थन या मोहिमेत महेंद्रसिंग धोनी याची भेट घेतली होती.