जळगाव प्रतिनिधी । सोयगाव तालुक्यातील बनोटीजवळ असणार्या धारकुंड धबधब्यात जळगावचे दोन तर पाचोर्याचा एक तरूण बुडाला असून त्यांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.
सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा
बनोटी गावाजवळ धारकुंड धबधबा असून तेथून हिवरा नदीचा उगम होतो. सध्या पावसाळ्यामुळे हा धबधबा वाहत असून अनेक पर्यटक या ठिकाण येत आहेत. या अनुषंगाने जळगाव येथील सहा तरूण रविवारी येथे फिरण्यासाठी गेले होते. यातील राहूल रमेश चौधरी (वय २३; रा. हनुमान नगर, जळगाव) व राकेश रमेश भालेराव ( वय २५, रा. सुप्रीम कॉलनी जळगाव) हे धबधब्याखाली आंघोळ करत असतांना बुडाले. रात्री उशीरापर्यंत त्यांचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. तर रविवारीच पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील गणेश भिकन सोनवणे हा तरूण देखील याच धबधब्याखाली वाहून गेला आहे.
सध्या पावसाळ्यामुळे पाणवठे, बंधारे आदी ओसंडून वाहत आहेत. तर धबधबेदेखील वाहत आहेत. धारकुंड धबधबा हा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असला तरी येथे धोक्याची सूचना देणारी पाटी वा सुरक्षारक्षकांची नितांत आवश्यकता असल्याचे या दुर्घटनांमधून दिसून आले आहे.
दरम्यान, बनोटी दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली. आज सकाळी पुन्हा एकदा मृतदेह शोधण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.