रमेश माणिक पाटील म्हणतात : ‘जबाब मिलेगा… करारा जबाब मिलेगा !’

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते रमेश माणिक पाटील यांच्यावर आज शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांनी पलटवार केल्यानंतर त्यांनी याला जोरदार उत्तर देणार असल्याची घोषणा केली आहे.

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे धरणगाव येथे अलीकडेच एका सभेच्या माध्यमातून पालकमंत्र्यांवर जोरदार टीका करण्यात आली होती. यात प्रामुख्याने रमेश माणिक पाटील यांनी केलेले भाषण तुफान गाजले होते. यात त्यांनी पालकमंत्र्यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांचे खंडण करतांना त्यांच्यावर प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या होत्या. सर्वात महत्वाचे म्हणजे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी विविध जाती समुहातील नेत्यांना त्रास दिला असून विशेष करून मराठा समाजाचे जिल्ह्यातील नेतृत्व संपविण्याचे काम केले असल्याचा गंभीर आरोप केला होता.

यावर आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील मराठा नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन रमेश पाटील यांच्या आरोपांचे खंडन करतांनाच त्यांच्यावर जोरदार प्रति-हल्ला केला. यात रमेश पाटील हे माकडचाळे करून पैसे कमावत असल्याचे सांगत त्यांनी त्यांचेच मित्र असणार्‍या किशोर राघो पाटील यांच्याकडून १५ लाख रूपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला. ते सातत्याने ब्लॅकमेलींगचे काम करत असल्याची टीका देखील करण्यात आली. तर, महत्वाचे म्हणजे ना. गुलाबराव पाटील यांनी सातत्याने मराठा समाजाला झुकते माप दिल्याचेही या पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले होते.

या पत्रकार परिषदेच्या नंतर रमेश माणिक पाटील यांनी सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल करून मराठा समाजबांधवांनी केलेल्या टिकेबाबत त्यांचे उपहासात्मक पध्दतीत आभार मानले. तसेच, या आरोपांवर आपण पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. यामुळे आता रमेश पाटील नेमके काय बोलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content