धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अवैधपणे आणि निर्दयतेने गुरांची वाहतूक करतांना पिकअप वाहन धरणगाव पोलीसांनी कारवाई करत धरणगाव तालुक्यातील साळवा फाट्याजवळ पकडले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील साळवा फाट्याजवळून पिकअप वाहनातून गुरांची अवैधपणे वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती धरणगाव पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी रविवारी २३ जून रोजी कारवाई करत पिकअप वाहन क्रमांक एमएच ०४ जेयू ०६९७ वाहन पकडले. गुरांची वाहतूकीबाबत परवाना विचारला असता चालक अंकुश महादू पिसे वय ३४ रा. मालखेडा ता. भोकरदन जि. जालना याने उडावाउडवीची उत्तरे दिली. यामध्ये तीन गुरांना निर्दयीपणे बांधून त्यांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोहेकॉ अनिल सुलताने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात चालक अंकुश महादू पिसे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चंदूलाल सोनवणे हे करीत आहे.