बीड प्रतिनिधी । राज्यातील हायप्रोफाईल लढतीपैकी एक असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीपासून आता 13 व्या फेरीपर्यंत धनंजय मुंडे सातत्याने आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी आपला आनंद व्यक्त करत थेट जेसीबीच्या लोडरमध्ये बसून गुलाल उधळला आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्या गटात निराशेचे वातावरण पसरले आहे. पंकजा मुंडे सुरुवातीपासून पिछाडीवर आहेत. या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने अस्तित्वाची लढाई लढत भाजपला जोरदार आव्हान दिलं. 2014 मध्ये बीडमध्ये राष्ट्रवादीचा केवळ एक आमदार म्हणून जयदत्त क्षीरसागर निवडून आले होते. मात्र, यावेळी ते जयदत्त क्षीरसागरही शिवसेनेत गेले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस समोरच्या अडचणी वाढल्या होत्या. अशावेळी धनंजय मुंडे यांच्या आघाडीने राष्ट्रवादीने बीडमध्ये पुनरागमन केल्याची चर्चा आहे.
राज्यातील सर्वात हायप्रोफाईल लढत म्हणून परळीच्या लढतीकडे पाहिलं जात होतं. पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्यात ही लढत झाली. धनंजय मुंडेंनी या निवडणुकीला अस्तित्वाची लढाई असल्याचं म्हटलं होतं. पंकजा मुंडेंनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंना 25 हजार 895 मतांनी पराभूत केलं होतं. मात्र, यावेळी निकाल बदलल्याचं पाहायला मिळत आहे.