फैजपूर, प्रतिनिधी | येथील तापी परिसर विद्यामंडळ संचलित धनाजीनाना महाविद्यालयाला आयएसओ ९००१:२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे.
स्वातंत्र्य सैनिकांच्या उत्स्फूर्त देणगीतून साकारलेले आणि कै. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या दूरदृष्टीतून जन्मलेले परिसरातील सर्वच आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्तरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची उत्तम सुविधा पुरविणारे महाविद्यालय आहे.सन १९६१पासून ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ हे ब्रीद उराशी जपून पारंपरिक अभ्यासक्रमासोबतच करियरच्या विविध संधी उपलब्ध करून देणारे कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव परिक्षेत्रातील उत्कृष्ट महाविद्यालयापैकी एक महाविद्यालय आहे. नुकतेच महाविद्यालयाने आयएसओ ९००१ : २०१५ मानांकन प्राप्त करून दर्जेदार गुणवत्तेची परंपरा अबाधित राखली आहे.
यासाठी विद्यार्थी केंद्रित दृष्टीकोन ठेऊन गुणवत्ता पूर्ण शिक्षणसंबंधी विविध बाबी तपासण्यात आल्या.आयएसओसाठी आलेल्या समितीने महाविद्यालयाबाबत निरीक्षण नोंदवले की, महाविद्यालयात विद्यार्थी केंद्रित विचार असून अभ्यासक्रम निवडीचे भरपूर पर्याय, विविध विषयात करियर ओरिएंटेड कोर्सेसची उपलब्धता, सुसज्ज प्रयोगशाळा, आय.सी.टी. युक्त वर्ग, अनुभवी प्राध्यापक, शुध्द पाणी, प्रशस्त क्रीडांगण, ग्राहक भांडार, कँटीन सुविधा, एन.एस.एस. व एन.सी.सी., विद्यार्थी कल्याण विभाग, क्रीडा विभाग अश्या सोयींनी युक्त महाविद्यालय आहे.
महाविद्यालयाच्या या यशाबद्दल तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष तथा रावेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरिष मधुकरराव चौधरी, उपाध्यक्ष प्रा.डॉ.एस.के. चौधरी, उपाध्यक्ष दामोदर हरी पाटील, चेअरमन लिलाधर विश्वनाथ चौधरी, व्हा.चेअरमन के.आर. चौधरी सचिव प्रा.एम.टी. फिरके, सदस्य मिलिंद वाघुळदे, प्रा.पी.एच. राणे, यांनीअभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.पी.आर. चौधरी, उपप्राचार्य प्रा.डॉ. अनिल भंगाळे, उपप्राचार्य प्रा.अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा.डॉ. उदय जगताप, उपप्राचार्य प्रा.दिलीप तायडे, तसेच सगळे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहेत.