
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सूर्यदेवाची उपासना आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी केली जाणारी पवित्र छठ पूजा जळगाव शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. उत्तर भारतीय संघ छठ पूजा समितीच्या वतीने सोमवारी २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील मेहरुण तलाव येथे या सामूहिक छटपूजेचे आयोजन करण्यात आले होते.
जळगाव शहरासह परिसरात वास्तव्यास असलेल्या मोठ्या संख्येने उत्तर भारतीय बांधवांनी या ठिकाणी एकत्र येऊन सामूहिक छठ पूजा केली. महिला आणि पुरुष पारंपरिक वेशभूषेत, लहान थोरांसह मोठ्या श्रद्धेने या सोहळ्यात सहभागी झाले होते. महिलांनी तलावात उभे राहून सूर्यदेवाला अर्घ्य दिले आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
उत्तर भारतीय संघ छटपूजा समितीचे जिल्हाध्यक्ष ललन यादव आणि उपाध्यक्ष मनोहर सहाने यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झालेल्या आमच्या बांधवांसाठी हा महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे. सामूहिक आयोजनामुळे सर्वांना एकत्र येऊन आपली परंपरा जतन करता येते. जळगाव शहरात राहूनही आपल्या संस्कृतीची ही ओळख टिकवून ठेवण्यासाठी समिती दरवर्षी अशा कार्यक्रमांचे आयोजन करते. मेहरुण तलाव परिसराला यानिमित्ताने पूजेसाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. भक्तीगीतांचे सूर आणि पारंपरिक विधीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
छठ पूजेच्या निमित्ताने जळगावात मिनी-बिहारचे चित्र पाहायला मिळाले. महिलांनी पूजेचे पारंपरिक साहित्य घेऊन तलावावर गर्दी केली होती. छठ पूजेच्या माध्यमातून उत्तर भारतीय बांधवांनी आपली श्रद्धा आणि संस्कृतीचे दर्शन घडवले. या यशस्वी आयोजनासाठी उत्तर भारतीय संघ छटपूजा समितीचे सर्व सदस्य आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. सूर्योदयावेळी अर्घ्य देऊन या महा-पर्वाची सांगता करण्यात आली.



