भडगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | येथील श्रीराम रथ उत्सव समितीच्या वतीने दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर यावर्षी मोठ्या जलोषात रथ उत्सव साजरा करण्यात येणार असून यासाठी भाविक सज्ज झाले आहेत. रथोत्सव निमित्ताने शहरातील प्रमुख मार्गावरुन श्रीरामाची मुर्ती ठेवलेल्या रथाची एकादशीला दि. १२ एप्रिल मंगळवारी मिरवणुक निघणार आहे.
भडगावचा श्रीराम रथोत्सव तालुक्यातील जनतेसाठी आकर्षण व नवसाला पावणारा रथ अशी ख्याती आहे. मध्यवर्ती शहरातील बाजारपेठेत भव्य श्रीराम मंदिर असुन रामनवमीला श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने एकादशीला श्रीरामाचा रथ शहरातील प्रमुख मार्गावर मानवी शक्तीने ओढला जातो.
आंदाजे १५० वर्षापूर्वी कै. शंकर आत्माराम वाणी यांनी आपल्या प्रारंभीच्या काळात शहरात बाजारपेठेत श्रीराम मंदीर बांधले होते. याच मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली होती. कालांतराने त्यांना रथोत्सव साजरा करण्याची कल्पना सुचली व रथोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. अशी माहिती जुणे जाणकार वयोवृध्द नागरीक देतात. श्रीराम रथोत्सव नेमका केव्हापासून साजरा करण्यास सुरुवात झाली यांची माहीती उपलब्ध नाही. रथोत्सव साजरा करण्यासाठी पारोळा येथील कारागिर कै. माधव रामजी मिस्तरी यांच्याकडून रथ तयार करुन घेतला होता. अशी माहीती मिळते.
श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा पूर्वीपासून आजतगायत कै. बापू शंकर वाणी व कै. निंबा शंकर वाणी यांच्या परिवारकडे तर रथोत्सव साजरा करण्याची जबाबदारी गावातील रथ उत्सव समितीकडे आहे.
१५० वर्षाची परंपरा असलेल्या श्रीराम रथोत्सव साजरा करताना रथावर श्रीराम, लक्ष्मण, सिता यांच्या मुर्ती स्थापन करुन सारथी दोन घोडे, भालदार चोपदार रथाच्या मागिल बाजुस अहिरम, बहिरम व रथावर हनुमान याचे लाकडी पुतळे ठेऊन रथ सजविला जातो. रथोत्सव साजरा करण्याकरिता बारा बलुतेदार समाज, विविध सामाजिक संघटना, शहरातील विविध मंडळ व तरुण वर्ग यांच्या मदतीने मानवी शक्तीने रथ शहरातील प्रमुख मार्गावर ओढला जात असतो. रथास मोग-या लावण्याचे काम शहरातील काही ठराविक तरुण करीत असतात. रथोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील नागरीक यांनी सहभागी व्हावे असे आवाहान रथ उत्सव समितीने केले आहे.