जळगाव Jalgaon-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकर यांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्यानंतर आता अध्यक्षपद कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (JDCC Bank Jalgaon ) निवडणुकीत तत्कालीन महाविकास आघाडीच्या पॅनलने दणदणीत विजय संपादन केल्यानंतर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची अध्यक्षपदी वर्णी लागली होती. त्यांचा विहीत एक वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही आप्पांनी राजीनामा न दिल्याने चर्चेला उधाण आले होते. या पार्श्वभूमिवर, काल सायंकाळी जिल्हा बँक संचालकांची बैठक पार पडली. यात अध्यक्ष गुलाबराव देवकर आणि उपाध्यक्ष शामकांत सोनवणे यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले. यानंतर येत्या काही दिवसांमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.
मध्यंतरीच्या घटनाक्रमात गुलाबराव देवकर यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता असली तरी असे न होता त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. यानंतर अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पदावर रवींद्रभैय्या पाटील, डॉ. सतीश पाटील वा संजय पवार यांच्यापैकी एका मान्यवराची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. तर ऐन वेळेस आ. एकनाथराव खडसे यांचे नाव देखील समोर येऊ शकते. तर उपाध्यक्षपदासाठी अमोल चिमणराव पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.