धरणगाव प्रतिनिधी । निवडणुकीची ऐन धामधुम सुरू होत असतांना माजी मंत्री गुलाबराव देवकर हे जामीनावर बाहेर आल्यामुळे जळगाव ग्रामीणमधील राजकीय समीकरण हे उत्कंठावर्धक वळणावर पोहचले आहे. याचा थेट फटका सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांना बसण्याची शक्यता यातून बळावली आहे.
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून दोन गुलाबराव म्हणजेच गुलाबराव देवकर आणि गुलाबराव पाटील हे राजकारणाचे दोन ध्रुव बनले आहेत. पहिल्या लढाईत देवकर तर दुसर्यात लढाईत पाटलांनी बाजी मारल्याने सामन्यांची मालिका ही सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. या निवडणुकीत विशाल देवकर हे उमेदवारी करतील असे संकेत मिळाले होते. तथापि, त्यांनी शेवटच्या क्षणाला आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर माघारीनंतर गुलाबराव देवकर हे जामीनावर बाहेर आले. तत्पूर्वी राष्ट्रवादीने देवकरांचे कट्टर विरोधक ज्ञानेश्वर महाजन यांच्या सौभाग्यवतीला उमेदवारी जाहीर केली होती. अर्थात ज्ञानेश्वर महाजन यांनी आधी देवकरांवर अनेकदा दबावतंत्राचा वापर केला आहे. अगदी देवकर लोकसभेत उभे असतांना त्यांनी विरोधात प्रचार केला. यामुळे या निवडणुकीत सौ. पुष्पा महाजन यांचा प्रचार करण्याऐवजी देवकरआप्पा हे घरी स्वस्थपणे बसून पडद्यामागची सूत्रे हलवणार असल्याचे निश्चीत झाले आहे.
जळगाव ग्रामीणमध्ये एकीकडे राजकीय विरोधक गुलाबराव पाटील तर दुसरीकडे पक्षांतर्गत विरोधक ज्ञानेश्वर महाजन अशी स्थिती असतांना देवकरांना सध्या तरी तिसर्या पर्यायाला प्राधान्य देणे अपरिहार्य बनले आहे. येथेच पी.सी. पाटील यांची एंट्री होते. खरं तर २०१४ साली पी.सी. पाटलांनी देवकरांच्या विरोधात निवडणूक लढविली असली तरी या दोन्ही नेत्यांचे एकमेकांशी अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत. २००९च्या विधानसभा निवडणुकीत गुलाबराव पाटील यांना पराभूत करण्यासाठी पी.सीं.नी पडद्याआडून देवकरांना केलेली मदत निर्णायक ठरली होती. यामुळे या मदतीची परतफेड करण्यासाठी आता देवकरआप्पा हे पी.सी. आबांचे उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांना मदत करतील का ? याकडे राजकीय निरिक्षकांचे लक्ष लागले आहे. असे झाल्यास जळगाव ग्रामीणमधील लढत ही अतिशय चुरशीची होण्याची शक्यता आहे. अर्थात, पडद्यावर गुलाबराव पाटील आणि चंद्रशेखर अत्तरदे असले तरी निर्णायक भूमिका ही गुलाबराव देवकर आणि पी.सी. पाटील या पडद्याआडच्या दिग्दर्शकांची राहील असे आज तरी चित्र दिसून येत आहे.