जळगाव प्रतिनिधी । अपेक्षेनुसार गुलाबराव देवकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळाली असून पहिल्याच यादीत त्यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
गुलाबराव देवकर यांना शरद पवार यांनी तयारीला लागण्याचे निर्देश दिले होते. यानुसार त्यांनी प्रचारदेखील सुरू केला आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली असून यात गुलाबराव देवकर यांच्या नावाचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आज बारा उमेदवारांची यादी जाहीर केली. यातील पहिल्या सहा उमेदवारांमध्ये बारामतीमधून सुप्रीया सुळे, बुलढाण्यातून राजेंद्र शिंगणे, जळगावातून गुलाबराव देवकर, सातार्यातून उदयनराजे भोसले, ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील तर परभणीतून राजेश विटेकर यांच्या नावांचा समावेश आहे. यानंतर दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यानंतर दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये सुनील तटकरे-रायगड; धनंजय महाडीक-कोल्हापूर; आनंद परांजपे-ठाणे; बाबाजी पाटील-कल्याण, मोहंमद फैजल-लक्षद्वीप यांच्या नावांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या यादीचे वैशिष्ट्य म्हणजे अद्यापही माढा आणि मावळ येथील उमेदवार घोषीत करण्यात आलेले नाहीत. तर हातकणंगले मतदारसंघात स्वाभीमानी शेतकरी पक्षाला पाठींबा देण्यात आलेला आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.